कोविड रुग्णाकडून डिपॉझिट मागणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करावी- पालकमंत्री अमित देशमुख

                                 



*कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 
"मिशन झिरो"ची प्रभावी अंमलबजावणी करावी*
                                                            - पालकमंत्री अमित देशमुख



* नागरिकांनी सर्दी, ताप व खोकला ही लक्षणे दिसताच तात्काळ चाचणी करून घ्यावी*


*कोविड रुग्णाकडून डिपॉझिट मागणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करावी*


*कोरोना च्या अनुषंगाने महापालिकेला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे*


*सर्व रुग्णालयातील बेड्स ऑक्सिजननेट करावेत*


*महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या प्रत्येक हॉस्पिटल मध्ये कोविड रुग्णसेवा सुरू झाली पाहिजे*


*खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी*


लातूर, (जिमाका):- कोविड-19 चा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात चेस दी व्हायरस ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवून "मिशन झिरो"ची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लातूर जिल्हा कोविड-19 च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरीक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, विभाग प्रमुख, सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
      पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेला covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने चेस दी व्हायरस अंतर्गत मोठ्या प्रमाणावर तपासण्या कराव्यात व माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे मिशन झिरो ही संकल्पना जिल्ह्यात यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. 
      तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ताप, सर्दी व खोकला हे लक्षणे जाणवताच तात्काळ तपासणी करून घ्यावी. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील बारा खाजगी रुग्णालय हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. तरी या सर्व खाजगी रुग्णालया मध्ये कोविड रुग्णावर उपचार सुरू झाले पाहिजेत व या रुग्णालयातील 80 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
       खाजगी रुग्णालयांना रुग्णावर उपचार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु काही खाजगी रुग्णालयाकडून कोविड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्याकडून डिपॉझिट मागितले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. रुग्णांकडून डिपॉझिट घेण्याची आवश्यकता नाही. यापुढील काळात कोणत्याही खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांकडून डिपॉझिट मागितले जाणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी व अशा रुग्णालयावर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. तसेच खाजगी डॉक्टर वर हल्ला करणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश त्यांनी दिले.
     सर्व शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयातील सर्व बेड्स ऑक्सिजन नेट झाले पाहिजेत. त्या करिता प्रशासन व खाजगी रुग्णालयांनी तात्काळ अंमलबजावणी करावी अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. त्याप्रमाणेच उपरोक्त सर्व रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या बेड ची माहिती डॅशबोर्ड च्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी व खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत याबाबत तक्रारी येणार नाहीत याविषयी दक्षता घ्यावी. कोरोना च्या उपाय योजना राबविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने जिल्हा प्रशासनाने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सूचित केले.
     जिल्ह्यात रोज जे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे त्या रुग्णांना उपचारासाठी कोणत्या ठिकाणी पाठविण्यात येणार आहे याची माहिती त्याच ठिकाणी त्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित बाधित असलेला रुग्ण इतरत्र फिरणार नाही व त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करणे सोयीचे होईल. स्वर्गीय पत्रकार गंगाधर सोमवंशी यांची कोरोना टेस्ट कोणत्या ठिकाणी झाली व त्यांच्यावर उपचार प्रथम कुठे झाले याबाबतची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी घेऊन त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण उपलब्धतेबाबत प्रशासनाने माहिती घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
     जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच प्रशासनाला पाच हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध झालेल्या होत्या त्याद्वारे रॅपिड टेस्टिंग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील दोन-तीन दिवसात 20 हजार रॅपिड टेस्ट किट उपलब्ध होणार असून या सर्व किट्स महापालिका, सर्व नगरपालिका व तालुका स्तरावरील यंत्रणेला देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काळात अधिक गतीने जास्तीत जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करणे शक्य होणार आहे. तसेच प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बेड्स उपलब्ध करून ठेवलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
      मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनीही लातूर शहर व जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यांना भेट देऊन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.