समाज कल्याण विभागाअंतर्गत गरजू दिव्यांगाना धान्य किटचे वाटप


    लातूर,(जिमाका):- कोरोना विषाणू कोविड-19 च्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदीची घोषणा केलेली आहे. संचारबंदीच्या काळामध्ये दिव्यांग व्यक्तिंची उपासमार होऊ नये म्हणून समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद,लातूर व रोटरी क्लब,लातूर व समाज कल्याण कार्यालय यांच्या अधिनस्त असणाऱ्या सेवाभावी संस्था संचलित अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त प्रयत्नाने जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात येत आहे.
   दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे. दिव्यांग/विशेष शाळा, कर्म शाळा व अत्यल्प मानधन असलेल्या अनुदानित वसतीगृहे यांच्या सहाय्याने जीवनावश्यक कीटचे वाटप जिल्हाभरात  करण्यात येत आहे. चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रायवाडी, झरी बुद्रुक, वडवळ, घरणी, चापोली, अजनसोंडा, नळेगांव, रोहिना, कबनसांगवी या गावातील गरजू, दिव्यांग लाभार्थ्यांना खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. भारतबाई सोळंके, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे व पंचायत समितीचे सभापती सौ. जमूनाबाई माणिक बडे व उपसभापती सज्जनकुमार लोनावळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर सुनिल खमितकर यांनी केले.
    लातूर जिल्ह्यामध्ये  दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठी असून कोरोना संकटकाळामध्ये अनेक दिव्यांग व्यक्तींचे हाल होताना दिसत आहेत. दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे आवश्यक असून एकूण 4 हजार धान्य किटचे या विभागामार्फत नियोजन केले आहे. 
     समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील दिव्यांग गरजू व्यक्तिंना धान्य वाटप केल्या नंतर त्यांच्या मार्फत समाधान व्यक्त केले जात आहे. समाजकल्याण विभागामार्फत भविष्यात दिव्यांगाकरीता वेगवेगळे उपक्रम व योजनाबाबत नियोजन केले जात आहे. दिव्यांग व्यक्तींना जि. प. लातूर यांच्या मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 779 दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन दिला असून जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन दयावे असे आवाहन पंचायत समित्यांना जि. प. अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी  केले आहे असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. लातूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.