* पर जिल्हयातील नागरिकांनी बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
लातूर, दि.7:- शासनाने लॉक डाऊन च्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर व इतर नागरिकांसाठी आपल्या मूळ गावी जाण्याची सवलत जाहीर केलेली आहे.
राज्य शासनाने 23 मार्चपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत लॉकडाऊन जारी केला. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व इतर कारणासाठी गेलेले नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत अडकून पडले. एसटी महामंडळाने राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना नुकतेच महाराष्ट्रात परत आणले. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आता राज्य शासनाने वेगवेगळ्या जिल्ह्यांत अडकून पडलेल्या नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळामार्फत बसेसची सुविधा दिली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील व राज्यातील अडकलेल्या नागरिकांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून घेतलेली आहे. तसेच ज्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. पर जिल्हा व पर राज्यातील किमान 20 अथवा बस क्षमतेच्या 50 टक्के नागरिकांनी एकत्रित येऊन एसटी महामंडळाकडे त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी बसची मागणी करावी. शासकीय बस मधून प्रवास करणार्या कोणत्याही परजिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. बसची सेवा ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणीच संबंधित नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
या पद्धतीने एसटी महामंडळाकडे बसची मागणी नोंदविल्या गेलेल्या नागरिकांना एस टी महामंडळ कडून पर किलोमीटर ठराविक दराने भाडे आकारण्यात येणार आहे. हे भाडे येथून जाणे व संबंधित प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सोडून परत येण्यासाठी लागू राहील. तरी लातूर जिल्ह्यात अडकलेल्या पर जिल्हा व पर राज्यातील नागरिकांनी एकत्रितपणे एसटी महामंडळाकडे बस ची नोंदणी नोंदवावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.