जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू
लातूर, :- जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना विषाणू बाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. ज्या 32 व्यक्तींचे स्वॅब नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते ते सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. परंतु हा आजार संसर्गजन्य असल्याने प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्रीकांत माहिती देत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वे जिल्ह्याच्या नागरी व शहरी भागाकरिता दिनांक 23 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव , जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादींना मनाई राहील. त्याचप्रमाणे पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना अनावश्यक रित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय येण्यास मनाई असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील जवळपास 54 व्यक्तींना होमक्वारंटाईन टाईम करण्यात आलेले आहे या व्यक्ती घरी थांबले पाहीजे. या व्यक्तींनी बाहेर फिरू नये, जर या व्यक्ती बाहेर फिरत असतील तर या व्यक्तींना सहा महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी स्पष्ट केले त्याप्रमाणेच शाळा व महाविद्यालयांना यापूर्वी सुट्टी जाहीर केलेली आहे तसेच येथे कार्यरत शिक्षकांनी कामाशिवाय शाळा-महाविद्यालयात उपस्थित राहू नये. उपस्थित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तसे आदेश प्राप्त करून घ्यावेत असे त्यांनी सूचित केले
पुणे मुंबई येथून येणाऱ्या लोकांना गावबंदी करू नये या ठिकाणाहून आलेले व्यक्तींची माहिती जवळच्या वैद्यकीय यंत्रणेला दयावी व त्या व्यक्तींची माहित तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल. परंतु ग्रामस्थांनी अशा लोकांवर गाव बंदी घालू नये, असे निर्देशही त्यांनी दिले
गाव पातळीवरील शासकीय यंत्रणा जसे अशा वकर्स अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तलाठी शिक्षक यांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी थांबणे गरजेचे आहे आणि पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले यापुढील काळात वैद्यकीय तपासणीसाठी गाव निहाय डॉक्टर देण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले
पिक विमा रक्कम आलेली आहे. परंतु 31 मार्च 2020 नंतरच पिक विमा वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यां0नी बँकांच्या शाखेत गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले एसटी बसेस व शहर वाहतूक बंद करण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणेच महापालिका व ग्रामीण भागात काम करण्यास इच्छुक असलेल्या खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी यावेळी केले
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने औषधी दुकाने सुरू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवू नये, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापना बंद आहेत परंतु त्यांचे कडील जे कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाचे पगार कपात करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
जिल्हा शल्य चिकित्सक ढगे म्हणाले की जिल्ह्यात बत्तीस व्यक्तींचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते ते सर्व नमुने निगेटिव्ह आलेले असून जिल्ह्यात एकही कोरूना बाधित रुग्ण नाही तसेच जिल्ह्यात एकूण 54 व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आलेले आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले की पोलीस विभाग सतर्क असून जिल्ह्यात एकही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच लातूर शहरातील वीस ते तेवीस चौकात एकूण 43 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात असून फिरत्या वाहनांद्वारे ही रस्त्यामध्ये गर्दी करणाऱ्या लोकांना सुचना दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.