मुंबई, - कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी लवकरच मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा पुरवठा करण्यात येणार आहे. यात गहू, तांदूळ आणि डाळ यांचा समावेश असणार आहे. स्वस्त धान्य दुकानातून या वस्तूंचे वाटप होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
पालकमंत्री देशमुख यांनी आज लातूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव यांच्याशी चर्चा केली आहे. शासनाकडून होणाऱ्या या वस्तूंचे वाटप योग्य तऱ्हेने करण्याबाबत त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गरज भासल्यास स्वस्त धान्य दुकानांतून भाजीपाला,फळे, दूध,तेल, गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन जाधव यांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.
सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंची अडचण भासता कामा नये याची पुरेपूर काळजी शासनाच्या स्तरावर घेतली जात आहे.उज्वला योजनेखालील गॅसधारकांना तीन सिलेंडरचा पुरवठा ही मोफत होणार आहे. स्वस्त धान्य दुकानातून तसेच अन्य ठिकाणावरून जीवनावश्यक वस्तू घेताना नागरिकांनी गर्दी टाळावी, सामाजिक अंतर राखून नियमांचे पालन करावे आणि कोरोना विरोधातील लढाईत सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.
स्वस्त धान्य दुकानांमधून लवकरच गरीबांना मोफत धान्य मिळणार - पालकमंत्री अमित देशमुख