राज्यातील पहिले प्लास्टिक मुक्त शहर लातूर व्हावे

पशु व अश्व प्रदर्शन मेळाव्याच्या रक्कमेत वाढ करणार
                                                      - राज्यमंत्री संजय बनसोडे


* पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा निमित्त   
      आयोजित पशु प्रदर्शनाचे उद्घाटन
    * राज्यातील पहिले प्लास्टिक मुक्त शहर लातूर व्हावे
     * पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी गोवंश संवर्धनासाठी 40 कोटीचा प्रस्ताव 
           शासनाला सादर


लातूर, दि. 1:- जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील विविध यात्रा निमित्त पशु व अश्व प्रदर्शन भरविली जातात, अशा प्रकारची प्रर्दशने हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे ही प्ररदर्शने अधिक मोठ्या स्वरूपात  करण्यासाठी या प्रदर्शनाच्या रक्कमेत भरीव वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
   सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा निमित्त जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री श्री बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी भूपेंद्र बोधनकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, यात्रा समिती प्रमुख अशोक भोसले, सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान कमिटीच्या श्रीमती पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
देवणी गोवंश लातूर जिल्ह्याचे भूषण असून याच्या संगोपन व संवर्धन यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली. सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा निमित्त पशुसंवर्धन विभागाने येथे आयोजित केलेले पशुप्रदर्शन हे परिसरातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार असून यापुढील काळात अधिक मोठ्या प्रमाणावर पशुप्रदर्शन भरवीण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या रकमेत भरीव वाढ करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
 पर्यावरण विभागामार्फत मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आलेला असून लातूर शहर हे राज्यातील पहिले प्लास्टिक मुक्त शहर होण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा असे, आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी केले.
  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने लातूर शहरात सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेच्या निमित्ताने भरवलेले पशुप्रदर्शन हे परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. तसेच लातूर महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात असून प्रतिबंधित प्लास्टिक मुक्त  लातूर शहर होण्यासाठी  महापालिकेच्यावतीने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्याचा देवणी गोवंश हा अत्यंत महत्त्वाचा असून या गोवंश ने आत्तापर्यंत तीस वेळा राज्य व राष्ट्र स्तरावर  पुरस्कार मिळवलेले आहेत. देवणी हा देशी गोवंश अत्यंत चांगल्या प्रतीचा असून याच्या संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 40 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे तरी या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमहोदयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी  यांनी केले.
    प्रारंभी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पशु प्रदर्शनाचे विधीवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पशुसंवर्धनातील छापण्यात आलेल्या विविध कृषी व पशुसंवर्धन विषयक स्टॉलला त्यांनी भेटी दिल्या. या वेळी पशुसंवर्धन विभागामार्फत  पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका  तयार करण्यात आलेली आहे या पुस्तिकेचे विमोचन मंत्रीमहोदयांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या पशू प्रदर्शनात लातूर परिसर व जिल्ह्यातील अनेक पशुपालकांनी त्यांची जनावरे प्रदर्शनात आणली आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बोधनकर यांनी केले तर आभार डॉक्टर गणेश निटुरे यांनी मानले.