सिद्धेश्वर यात्रा महोत्सव आढावा बैठक
सिद्धेश्वर यात्रा महोत्सव

 प्लास्टिक मुक्त व्हावा

रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन

लातूर /प्रतिनिधी : २१ फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव सुरू होत आहे . यावर्षीची यात्रा प्लास्टिक मुक्त व्हावी तसेच यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केल्या . यात्रा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल विविध सूचना करत हा महोत्सव लातूरच्या लौकिकाला साजेसा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या . 

   यात्रा महोत्सवाच्या तयारीबाबात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी जी श्रीकांत बोलत होते . या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर , अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे , देवस्थानच्या प्रशासक श्रीमती यु एस पाटील, माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे  विक्रम गोजमगुंडे , मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे , विश्वस्त रमेश बिसेन, नरेश पंड्या , विशाल झांबरे , दत्ता सुरवसे यांची उपस्थिती होती . 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जी श्रीकांत म्हणाले की , सिद्धेश्वर यात्रा महोत्सव लातूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे . या लौकिकाला साजेसे उपक्रम या महोत्सवात आयोजित केले जावेत. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते . नागरिक खरेदी करतात .खरेदी केलेल्या वस्तू नेण्या -आणण्यासाठी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो हा वापर बंद करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत यात्रा महोत्सव प्लास्टिकमुक्त होण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे ते म्हणाले .

यात्रा महोत्सवानिमित्त महाशिवरात्रीच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी मांडली . या शिबिरात जे युवक किंवा नागरिक रक्तदान करतील त्यांना श्रींचे थेट दर्शन घेण्यासाठी पास देण्यात यावा असेही निर्देश दिले . दरवर्षी महोत्सवात कुस्ती स्पर्धाचे आयोजन केले जाते. यंदाही भव्य -दिव्य प्रमाणात या स्पर्धा व्हाव्यात . कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन  करण्यासाठी विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात यावीत . कृषी आणि पशु प्रदर्शनांचे आयोजन करत शेतकऱ्यांना मार्गदर्शक उपक्रम राबवावेत असेही ते म्हणाले . यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते  सहकार्य  प्रशासनाने करावे असे निर्देशही त्यांनी दिले