बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार
लातूर दि.16 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन दिनांक 17 फेब्रुवारी पासून स्व. दगडोजीराव देशमुख नाटयगृह, लातूर येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 17 फेब्रुवारी सकाळी 11.00 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शुभहस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभाला लातूर जिल्ह्रयाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे तसेच रंगभूमीवरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी या स्पर्धेला लाभलेले मान्यवर परीक्षक श्रीमती अरुंधती भालेराव, श्रीमती वीणा लोकूर, श्री. शंकर घोरपडे, श्री. प्रकाश पारखी आणि श्री. एकनाथ आव्हाड हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील रंगभूमीस उत्तम रंगकर्मीची कमतरता भासू नये आणि लहान वयाच्या कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देऊन भावी काळात त्यांच्यामधुन उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने मराठी बालनाट्यस्पर्धेचे आयोजन गेली 16 वर्ष करीत आहे.
या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागातील जिल्हयातील प्राथमिक फेरीतील तब्बल 353 नाटकांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेली दर्जेदार 24 बालनाटके लातूरकरांना बघता येणार आहेत. या स्पर्धेतील बालनाटक पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे.
अंतिम फेरीतील बालनाटकांचा आस्वाद घेण्याकरीता व बालकलावंतांना प्रोत्साहित करण्याकरीता रसिक प्रेक्षकांनी दि. 17 फेब्रुवारी पासून दररोज सकाळी 11 वाजल्यापासून स्व. दगडोजीराव देशमुख नाट्यगृह, लातूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.