राज्यमंत्री अदिती तटकरे व महासंचालक पांढरपट्टे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन
लातूर - पत्रकारिता ही दुसऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी असते. सामाजिक बांधिलकी याचा अर्थ पूर्ण वेळेची पत्रकारिता ही नैतिकतेने व प्रलोभनापासून दूर राहून करावयाची असते. अनेक थोर पत्रकार आपल्या देशात व महाराष्ट्र राज्यात होऊन गेले. त्यांनी आपल्या कार्यातून ज्वलंत विचारांची बांधिलकी स्वीकारली. त्यांनी साप्ताहिक व दैनिकात पत्रकारिता करीत असताना आपल्या कार्याचे समाजात भरपूर योगदान दिले. आपल्या विचारांचा समाजात प्रचार- प्रसार व्हावा म्हणून अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या कार्याने समाजाला निश्चित विचारांची दिशा दिली. काळाच्या कसोटीवर टिकले ते त्यांचे कार्य व विचार. आज पत्रकारितेचे क्षेत्र खूपच विस्तारले आहे. हि चळवळ जीवंत राहणे गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून साप्ताहिक व दैनिक या पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री अदिती तटकरे व महासंचालक पांढरपट्टे यांना देण्यात आले.
या निवेदनामध्ये पत्रकारांना जाहिरात , विमा , आरोग्य, मानधन , टोलमाफी, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक आरक्षण व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पत्रकारांसाठी गृह योजना आदी महत्त्वपूर्ण विषयाचे निवेदन राज्यमंत्री अदिती तटकरे यांना मंत्रालय मुंबई येथे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तगलपल्लेवार, रविकिरण सूर्यवंशी, वामन अंकुश, दत्तात्रय परळकर , किशोर जाधव, रघुनाथ बनसोडे, आशिष बनसोडे, अनुज केसरकर, पाटिल आदींची उपस्थिती होती.